... कधीतरी

Monday, April 24, 2006

तेलगु चित्रपट

मला ब्लॉग लिहून तसे बरेच दिवस झाले. म्हणजे मी ब्लॉगच्या नावाला खरोखरीच जागतो आहे, हे पाहुन माझे मलाच कौतुक वाटते आहे :)

वास्ताविक पाहता हा ब्लॉग लिहायचेदेखील माझ्या खुप जिवावर आले होते ... पण आपला मराठी वाचकवर्ग फ़ार मौल्यवान साहित्याला मुकेल, याहीपेक्षा आपला मराठी प्रेक्षकवर्ग फ़ार मोठ्या कलाकृतीला मुकेल असा एक बहुजनहीताय विचार करुन हा ब्लॉग लिहायला घेतला.

तेलगु लोकांचे चित्रपटप्रेम जगजाहीर आहे , असे मी जरी आत्तापर्यंत ऐकत आलो असलो तरीही तेलगु लोक या चित्रपटांमध्ये असे काय पाह्तात, हे कुतुहल मात्र सदैव होते. इथे हैद्राबादमध्ये शंभराहुन अधिक सिनेमागृहे आहेत आणि ती सर्व सदैव तुडुंब भरुन वाहत असतात. इथल्या अगदी साधारण थेटरांची क्वालीटी पण खरोखरीच चांगली आहे.

आता माझे आख्यान पुरते घेउन मूळ मुद्द्याला हात घालतो. तर इथे एक बाळकृष्ण नावाचा एक प्रचंड लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे चित्रपट पहायची संधी कधी चुकुनजरी तुम्हाला लाभली तरी स्वत:ला भाग्यवान समजा ! मग आपल्याला तेलगु कळत नाही असा क्षुद्र विचारदेखील मनात येऊ देऊ नका. कारण हे चित्रपट भाषा-स्थळ-काळ-सापेक्षता-वास्तविकता या सांसारीक बंधनांच्या पलिकडे जाउन निर्मीले आहेत. हे चित्रपट पाहुन आपण आतापर्यंत किती क्षुल्लक गोष्टींकडे कला आणि मनोरंजन म्हणुन पाहत होतो असा एक आत्मपरिक्षणपर विचारदेखील तुमच्या मनात येणे साहजीक आहे, पण म्हणुन निराश होऊ नका. ही आपल्याला लाभलेली चुक सुधारण्याची संधी आहे असे समजा आणि आता या बाळकृष्णाच्या लीला पहा ...

http://www.youtube.com/watch?v=eB5JzLy2e3c&search=balayya

http://www.youtube.com/watch?v=GZJDTszmN_Y&search=balayya

http://www.youtube.com/watch?v=ypGI3NecLc0&search=balayya


आणि आता हे पहा ...

http://www.youtube.com/watch?v=WMJ_y936XoU&search=balayya


मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा चांगले दिवस आलेत असे आपण म्हणतोय खरे, पण अशा दर्जाचा एक तरी मराठी चित्रपट तुमच्या पाह्ण्यात आलाय का ???

Wednesday, February 22, 2006

मराठी भाषेला लाभलेली नवीन म्हण

मराठी भाषेला लाभलेली नवीन म्हण :

" कोंबडी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो बर्ड फ्लु "

Friday, February 03, 2006

परवाच्या सुट्टीत घरी गेलो असतानाची घटना :
मराठी पिक्चर बघायची हुक्की आली म्हणुन आमच्या घराजवळच्या सीडी शॉप मध्ये गेलो. दुकानदार ओळखीचाच होता.

तो : काय साहेब, बऱ्याच दिवसांनी दिसलात ! कुठं आहेस सद्ध्या ?
मी: सद्ध्या हैद्राबादमध्ये आहे बघा.
तो: का ? दिल्ली सोडली ?
मी: हो.. बरेच दिवस झाले की...
तो: मग, आता काय काम करतोयस ?
मी: सॉफ्टवेर कंपनीत कामाला आहे.
तो: काय काम ? विक्री का दुरुस्ती ?

(इथे मात्र मी गोंधळलो... पण जास्त वेळ विचार करण्यात न घालवता त्यातल्या त्यात बरे उत्तर देत...)

मी: विक्री.
तो: कुठुन आणता ?
मी: अमेरीकेतुन.
तो: च्यायला भारी आहे की राव... मग मार्जीन चांगलंच सुटत असेल...
मी: (सावध पवित्रा घेत) होय... बऱ्यापैकी.. काका, तुमच्याकडं 'नवरा माझा नवसाचा' आहे का ?
तो: थांब बघतो.

माझ्या नशीबाने त्याला लगेचच सीडी मिळाली आणि मी पटकन बाहेर पडलो...

Friday, January 13, 2006

आज मी एक अप्रतिम विरोधाभास पाहिला. सकाळी चहा पीत गॆलरीत थांबलो असताना आमच्या शेजारच्या घरातला एक शाळकरी मुलगा आपल्या घराच्या गच्चीत मस्तपैकी पतंग उडवत होता. थोड्याच वेळात त्याची आई तिथे आली आणि त्याला ओरडत खाली घेऊन गेली. ती तेलगुमध्ये ओरडत असल्याने मला शब्दश: अर्थ कळला नाही. पण संदर्भ कदाचीत, "या पोराला काही लाज आहे का बघा... शाळा, अभ्यास सोडुन इथं पतंग उड्वत बसलाय..." असाच काहीतरी असावा.
---
आत्ता संध्याकाळी आमच्या कंपनीच्या टेरेसवर मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो होतो तेंव्हा पाहिले... आमच्या समोरच एक आय.टी. पार्कची भव्य इमारत आहे. त्यांच्या टेरेसमध्ये दर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास काही ना काही 'इव्हेंट' असतात. म्हणजे तिथल्या कुठ्ल्या ना कुठ्ल्या कंपनीचे एम्प्लॊयी जमून काहीतरी ऎक्टिव्हिटिज करत असतात. संक्रांत तोंडावर असल्याने त्याला अनुरुप असा पतंग उडवायचा कार्यक्रम आज होता. बहुतांश एम्प्लॊयी तरूणच (आणि तरुणी :)) होते. त्यामुळे मस्त एंजॊय करत होते. आणि म्हणुनच आम्ही सगळे जण त्यांची गंमत बघत आणि आपल्या कंपनीत असे काही का होत नाही, ती लाल ड्रेस चांगली की जीन्सवाली अशा काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करत तिथे थांबलो होतो.


त्या सगळ्यांच्यात एक मध्यमवयीन ग्रुहस्थ होता. म्हणजे तसे बरेच होते, पण त्याच्या भोवती विशेष गर्दी होती. पोट सुटलेला, नेकटाय बांधलेला, जाड भिंगाचा चश्मा लावलेला ... कदाचीत प्रोजेक्ट मॆनेजर असावा. या जनतेने त्याच्या हातात मांजा दिला होता आणि त्याला 'बकप' करत होते. मधुनच एकमेकांना टाळ्या देत होते (म्हणजे त्याची प्रोपर 'उडवत' होते) पण मॆनेजर लोकांच्या ऒबजेक्टिव्ह्स मध्ये 'टीम बिल्डींग' हे एक महत्वाचे ऒबजेक्टिव्ह असल्याने तोही बिचारा जमेल तसा पतंग उडवायचा प्रयत्न करत होता. तसा त्याचा पतंग दहा फ़ुटापेक्षा वर गेल्याचे मी तरी पाहिले नाही, पण तरीही पब्लिक मात्र त्याला सॊलीड चीयर अप करत होते.

सगळं बालपण अभ्यासात घालवलं, मॆनेजर झालो आणि आता या वयात पतंग उडवायला लागतोय अशी काहीशी त्याची परिस्थीती झाली होती आणि याउलट तो सकाळचा मुलगा...

मला काही दिवसांपूर्वी एक फ़ोरवर्डेड मेल आलं होतं... त्यातली कविता अशी होती :

ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी ... फुलपाखरांच्या मागं धावायचं
तरुण वयात 'पाखरांच्या' मागं धावायचं
प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं
म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं
तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं
प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं
म्हातारपणी त्याच बागेत निव्रुत्त मनानं रमायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथं मिटवायचं
तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुद्धा करायचं
प्रौढ झाल्यावर आपल्या सगळ्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं
उतारवयात सार्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात
पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात
वार्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं
गडगडणार्या मेघासारखं बोलकं होता व्हायला हवं
अंधाराच्या गर्भामध्ये ज्योत ठेवता यायला हवी
एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी
कुठ्ल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...

तरीही...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

Tuesday, October 11, 2005

संपादकीय

वाचकहो,

नवरात्र संपले - दसरा उजाड्ला... आता लवकरच दिवाळी येईल. सालाबादाप्रमाणे यंदाही आपल्या ब्लॉगवरील दिवाळी अंकाची आपण आतुरतेने वाट पहात असाल ! पण तत्पूर्वी नवीन वर्षासाठी आपल्या सभासदत्वाची नोंद्णी करायला विसरु नका. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगसाठी आणखी सभासद गोळा करायचे कामही तुम्हाला करायचे आहे !

तेव्हा आपली वर्गणी लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. आमचा पत्ता आपल्याला ठाऊक आहेच.

आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग देश-विदेशात पसरला आहे याची जाणीव ठेवून आम्ही इंटरनेटद्वारे देखील आपल्याला वर्गणी भरता येईल याची व्यवस्था केली, आहे हे तर आपण जाणताच !

संपादक आपल्या चेक्स, डिमांड ड्राफ्ट्स किंवा जमलेच तर कॅशची आतुरतेने वाट पहात आहेत.

आपला नम्र,

संपादक
(कधीतरी)

Thursday, June 16, 2005

मी आणि माझे रूममेट्स

शिक्षणासाठी घराबाहेर पड्ल्यानंतर आपले मित्र हाच आपला मोठा आधार असतो. त्यातही अगदीच जवळचा मित्र म्हणजे आपला रूममेट. बाहेर लोकांसमोर तुमचे इम्प्रेशन काही असो. रूममेट ही एक अशी व्यक्ती असते जी तुम्हाला 'अंतर्बाह्य ओळखून' असते. अड्ल्या-नड्ल्या प्रसंगी रूममेटच उपयोगी पड्तो.

काही रूममेट खरोखरीच वर उल्लेखल्याप्रमाणे एकदम आयडीयल असतात. पण काही मात्र अगदी 'राशीला बसल्यासारखे' आपल्या आयुष्यात येतात. अशा वेळी दिवस मोजण्याखेरीज इलाज नसतो.

मला आतापर्यंत या दोन्ही प्रकारचे रूममेट लाभले आहेत. हॊस्टेलवर असताना असंख्य प्रकारच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पहायला मिळाल्या. रूममेटही त्यातलाच एक प्रकार. (माझे जे कोणी रूममेट हा ब्लॊग वाचत आहेत, ते पहिल्या प्रकारात येतात. त्यामुळे त्यानी निश्चिंत होऊन पुढ्ला भाग वाचावा)

शिक्षणानंतर आता नोकरीसाठी बाहेर पड्लो तरी रूममेट हा प्रकार बरोबर असतोच. इथे आल्यावर मला एकदम वेगवेगळ्या 'टाइपचे' रूममेट पाहायला मिळाले. मी जेंव्हा इथे आलो, तेंव्हा माझे तीन रूममेट होते - एक तामिळ, एक कन्नड आणि एक बिहारी. प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी, त्यामुळे जेवणात भाजी कुठली बनवायची इथपासून वादाला सुरुवात. बिहारी बंधुला 'आलू' म्हणजे जीव की प्राण, तर तामिळ मित्राला बटाट्याचा तीव्र तिटकारा. ते दोघेही कायम एकमेकांची कशी जिरवता येइल ते बघायचे. म्हणजे जेंव्हा तामिळ रूममेट भाजी आणायला जाई, तेंव्हा तो बटाटे अजिबात आणत नसे, तर जेव्हा बिहारीबाबू भाजी आणीत तेंव्हा बटाटेच बटाटे. नंतर त्यातला जो कन्नड रूममेट होता तो काही महिन्यांसाठी बाहेर गेला, त्याच्याऐवजी आला - एक तेलगु रूममेट ! त्यामुळे हाही काय 'प्रकार' असतो ते बघायला मिळाले. काही दिवसांनी तो कन्नड रूममेट परत आला, आणि आमच्या फ्लॆटवर - एक तामिळ, एक बिहारी, एक कन्नड, एक तेलगु आणि मी मराठी असे मिश्रण बनले. काही असो, पण प्रत्येकाच्या तर्हा बघून मजा यायची. (अर्थात मीही त्यातलाच एक होतो...)

वर्षभरानंतर मात्र एक एक जण सोडुन चालला, आणि समीकरण पुन्हा बदलले.

सद्ध्या स्थिती अशी आहे, की मी, तीन बिहारी रूममेट्सबरोबर राहतोय... इतकेच काय, तर आमची स्वयंपाकीण पण बिहारी ... (अर्थात मेजॊरिटीचा विजय होणार हे तर ओघानेच आले) त्यामुळे सद्ध्या आयुष्यात 'बटाटयाशिवाय' दुसरं काय नाय ... कधी तरी अगदीच बदल म्हणुन मग मी याआधी कधीच पाहिल्या नाहीत अशा काही पालेभाज्या आणल्या जातात, आणि मग त्यात बटाटा (तो तर हवाच !) आणि पनीर :( घालून त्याची भाजी केली जाते. काही दिवसांपुर्वी माझी हिंदी सुधारली अशा खुशीत जो मी होतो, तिला आता 'ललवा' श्टाइल आली आहे. फ्लॆट्वरच्या सार्वजनीक स्वच्छ्तेचे केंव्हाच तीन-तेरा वाजले आहेत... माझा एकट्या-दुकट्या बिहारी माणसाविषयी अजिबात राग नाही (पण तिघांविषयी मात्र आहे ;), सॊरी, चौघांविषयी...)

तेंव्हा लोकहो, आपला एक मित्र उत्तर प्रदेशातल्या एका गावात मोठ्या हालाखीत दिवस काढतो आहे हे विसरु नका. नाहीतर काही दिवसानी माझी एकंदरीत हिंदी आणि पनीर-बटाटे खाऊन सुट्लेले शरीर पाहुन, मी कुणी यादव किंवा पाण्डे आहे अशी समजुत करुन घेतली तर त्यात नवल नको !

Monday, May 30, 2005

दवं पिऊन नवेली,
झाली गवतांची पाती,
गाणी जुनीच नव्याने,
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे,
जग उदास उदास...


 
counters