... कधीतरी

Thursday, April 14, 2005

जुगाड

उत्तर भारतात, विशेषतः दिल्ली-उत्तर प्रदेश-हरयाणा भागात बोली भाषेत सर्रास आढळणारा एक शब्द आहे - 'जुगाड' ! अर्थात पुण्यामुंबईच्या प्रचलित हिंदीमिश्रीत्त बोलण्यात याचा समावेश झाला असेल तर मला माहीत नाही, पण मी मात्र इथे आल्यावरच पहिल्यांदा हा शब्द ऐकला.

जुगाड हे जरी नाम असले तरी ते क्रियापदासारखे वापरले जाते. म्हणजे 'जुगाड करना' वगैरे. ते कुठे वापरले जाते याचे मात्र काटेकोर असे काही नियम नाहीत. त्याचा वाक्यातील प्रयोग आणि अर्थ संदर्भानुसार/परिस्थीतीनुसार बदलत असतो.

जुगाड करणे याचा ढोबळ मानाने पुढीलपैकी काहीही अर्थ होऊ शकतो - हेराफेरी करणे, सेटींग करणे, एखादी गोष्ट (जमत नसेल तर) adjust करणे... इ. थोडक्यात म्हणजे येन केन प्रकारेण काम 'मार्गी' लावणे.

काही real life examples :

- संध्याकाळी पाच-सहाचा सुमार. ऒफ़िस सुटायची वेळ. ट्रॆफ़िक जाम. अशातच सिग्नल पडायच्या आतच कुणीतरी आपली मोटरसायकल दामटवायला बघतो, आणि एवढ्यातच ट्रॆफिक पोलिसाची नजर त्याच्यावर पड्ते. गाडी साइड्ला घ्यायचे निमंत्रण त्याला मिळते. लायसंस , PUC , गाडीची कागदपत्रे अशा काही फ़ॊर्मॆलिटीस पूर्ण करत असतानाच तो पोलिसाला म्हणतो, " साबजी, कुछ जुगाड कर्दो ना..." पोलिस आधी त्याच्याकडे क्षणभर पाहतो, आणि डोळे मिचकावतो. मग तोही मिस्किल हसतो आणि मग 'बातचीत' सुरु होते.

- गेल्याच आठ्वड्यात कोड्ची डिलीव्हरी देऊन आता टाइमपास करायच्या मूड्मध्ये असतानाच त्याला मेल येते. मेल क्लायंट्चे असते आणि टिमलीडर, मॆनेजर असे सगळे जण cc मध्ये विराजमान असतात. आपण दिलेल्या कोडने integrationच्या वेळी बरोब्बर दगा दिलेला असतो. बग्सची लिस्ट येते. आणि मग पुन्हा एकदा फाइट सुरु होते. नवीन डिलीव्हरीची तारीख जवळ येत असते पण लिस्टमधले बग्स काही सरळ मार्गाने सुटत नसतात. शेवटी तो वैतागतो आणि स्वतःशीच म्हणतो, " साला, अब तो जुगाड मारना पडेगा..." मग तो फक्त integrationच्या साठी वापरायचे तेवढेच टेस्ट्व्हेक्टर घेतो आणि फक्त तेवढयाच केसेस साठी कोड बदलुन नवीन डिलीव्हरी देतो. integration ची पहिली फेज तरी व्यवस्थीत पार पडणार असते. तो पुन्हा निवांत होतो ... पुढ्च्या मेलपर्यंत !

...

असा हा जुगाड ही फक्त एक abstract concept नसून त्याला 'मूर्त' स्वरूपही आहे, हेही परवाच मला कळले. गाझीयाबादमध्ये एका बसची वाट बघत असताना माझ्या ज्ञानात ही मोलाची भर पडली. बराच वेळ झाला तरी बस काही येईना, तेव्हा एका सहप्रवाशाने सुचवले, "और थोडी देर रुको, जुगाड आ जायेगा" मग मीही हा जुगाड 'दिसतो तरी कसा, ते बघुया' म्हणुन त्याची आतुरतेने वाट बघू लागलो. थोड्याच वेळात - पुढ्चा भाग सायकलचा, पण पैडल मारायची गरज नाही कारण खाली लुनाचे की कसलेतरी इंजीन जोड्लेले, मागे आणखी दोन चाके जोडुन त्यांच्या मधे लाकडी फळ्यांनी एक मोठा बॊक्स तयार केलेला ज्यायोगे माणसे, जनावरे, सामान अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तुंची वाहतुक सहज करता यावी, असे एक प्रकरण येताना दिसले, ( त्यात इंधन कोणते वापरले होते हे मला समजु शकले नाही ) आणि " हाच तो जुगाड होय !" हा साक्षात्कार मला झाला, आणि ' अजि म्या ब्रम्ह पाहिले' असे काही भाव माझ्या चेहर्यावर गोळा झाले.

असा हा सर्वव्यापी 'जुगाड' हा दिल्लीकरांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे ...


 
counters