... कधीतरी

Friday, January 13, 2006

आज मी एक अप्रतिम विरोधाभास पाहिला. सकाळी चहा पीत गॆलरीत थांबलो असताना आमच्या शेजारच्या घरातला एक शाळकरी मुलगा आपल्या घराच्या गच्चीत मस्तपैकी पतंग उडवत होता. थोड्याच वेळात त्याची आई तिथे आली आणि त्याला ओरडत खाली घेऊन गेली. ती तेलगुमध्ये ओरडत असल्याने मला शब्दश: अर्थ कळला नाही. पण संदर्भ कदाचीत, "या पोराला काही लाज आहे का बघा... शाळा, अभ्यास सोडुन इथं पतंग उड्वत बसलाय..." असाच काहीतरी असावा.
---
आत्ता संध्याकाळी आमच्या कंपनीच्या टेरेसवर मित्रांबरोबर गप्पा मारत बसलो होतो तेंव्हा पाहिले... आमच्या समोरच एक आय.टी. पार्कची भव्य इमारत आहे. त्यांच्या टेरेसमध्ये दर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास काही ना काही 'इव्हेंट' असतात. म्हणजे तिथल्या कुठ्ल्या ना कुठ्ल्या कंपनीचे एम्प्लॊयी जमून काहीतरी ऎक्टिव्हिटिज करत असतात. संक्रांत तोंडावर असल्याने त्याला अनुरुप असा पतंग उडवायचा कार्यक्रम आज होता. बहुतांश एम्प्लॊयी तरूणच (आणि तरुणी :)) होते. त्यामुळे मस्त एंजॊय करत होते. आणि म्हणुनच आम्ही सगळे जण त्यांची गंमत बघत आणि आपल्या कंपनीत असे काही का होत नाही, ती लाल ड्रेस चांगली की जीन्सवाली अशा काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करत तिथे थांबलो होतो.


त्या सगळ्यांच्यात एक मध्यमवयीन ग्रुहस्थ होता. म्हणजे तसे बरेच होते, पण त्याच्या भोवती विशेष गर्दी होती. पोट सुटलेला, नेकटाय बांधलेला, जाड भिंगाचा चश्मा लावलेला ... कदाचीत प्रोजेक्ट मॆनेजर असावा. या जनतेने त्याच्या हातात मांजा दिला होता आणि त्याला 'बकप' करत होते. मधुनच एकमेकांना टाळ्या देत होते (म्हणजे त्याची प्रोपर 'उडवत' होते) पण मॆनेजर लोकांच्या ऒबजेक्टिव्ह्स मध्ये 'टीम बिल्डींग' हे एक महत्वाचे ऒबजेक्टिव्ह असल्याने तोही बिचारा जमेल तसा पतंग उडवायचा प्रयत्न करत होता. तसा त्याचा पतंग दहा फ़ुटापेक्षा वर गेल्याचे मी तरी पाहिले नाही, पण तरीही पब्लिक मात्र त्याला सॊलीड चीयर अप करत होते.

सगळं बालपण अभ्यासात घालवलं, मॆनेजर झालो आणि आता या वयात पतंग उडवायला लागतोय अशी काहीशी त्याची परिस्थीती झाली होती आणि याउलट तो सकाळचा मुलगा...

मला काही दिवसांपूर्वी एक फ़ोरवर्डेड मेल आलं होतं... त्यातली कविता अशी होती :

ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी ... फुलपाखरांच्या मागं धावायचं
तरुण वयात 'पाखरांच्या' मागं धावायचं
प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं
म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं
तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं
प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं
म्हातारपणी त्याच बागेत निव्रुत्त मनानं रमायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथं मिटवायचं
तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुद्धा करायचं
प्रौढ झाल्यावर आपल्या सगळ्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं
उतारवयात सार्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात
पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात
वार्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं
गडगडणार्या मेघासारखं बोलकं होता व्हायला हवं
अंधाराच्या गर्भामध्ये ज्योत ठेवता यायला हवी
एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी
कुठ्ल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...

तरीही...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !


 
counters